बुलढाणा, (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. २५ ऑगस्ट-जिल्ह्यातील बहुतांश भागात सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडॉप्टेरा लिटुरा), उंट अळी, घाटे अळी आणि केसाळ अळी यांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
नियमित पिकाची पाहणी करण्याचे आवाहन
पाने खाणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीतील किडींचे कोष नष्ट करावेत. सोयाबीन पिकाभोवती एरंडी किंवा सूर्यफुलाची एक ओळ सापळा पीक म्हणून लावावी. पिकामध्ये आढळणारे अंड्यांचे पुंजके तसेच समूहाने आढळणाऱ्या लहान अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
शेत तणमुक्त ठेवण्यासोबतच संतुलित खत व्यवस्थापन करणेही महत्त्वाचे आहे.
फेरोमोन सापळ्यांचा वापर करण्याचा सल्ला
पाने खाणाऱ्या अळ्यांच्या पतंगांचे सर्वेक्षण करण्यासाठी हेक्टरी पाच कामगंध म्हणजेच फेरोमोन सापळे लावावेत. यामध्ये स्पोडोल्युअर किंवा हेलील्युअर प्रलोभकाचा वापर करावा. तसेच भक्षक पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रति एकर ८ ते १० पक्षीथांबे उभारण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टिन १० हजार पीपीएम ५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
जैविक नियंत्रणाला प्राधान्य
अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास सुरुवातीच्या टप्प्यात जैविक नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. यासाठी बिव्हेरिया बॅसियाना ५ मिली प्रति लिटर, एस.एल.एन.पी.व्ही. (५०० एल.ई.) ५ मिली प्रति लिटर किंवा मेटारायझियम रिलायी ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यासच रासायनिक नियंत्रण
कामगंध सापळ्यात सलग २ ते ३ दिवस प्रति सापळा ८ ते १० नर पतंग आढळल्यास किंवा फुलोऱ्यापूर्वी प्रति मीटर ओळीत १० तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळ्या आढळल्यास कीड नियंत्रणाची उपाययोजना करावी.
तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत प्रति मीटर ओळीत ३ उंट अळ्या किंवा ५ घाटे अळ्या आढळल्यास कीटकनाशकाची फवारणी करावी.
यासाठी क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एससी १५० मिली प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पर्याय म्हणून इमामेक्टिन बेंझोएट १.९० टक्के ईसी ४२५ मिली प्रति हेक्टर, फ्लुबेंडायामाइड २० टक्के डब्ल्यूजी २५० ते ३०० ग्रॅम प्रति हेक्टर किंवा फ्लुबेंडायामाइड ३९.३५ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एससी १५० मिली प्रति हेक्टर यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करता येईल.
इतर किडींचा प्रादुर्भाव असल्यास मिश्र कीटकनाशकांचा पर्याय
ज्या क्षेत्रात पाने खाणाऱ्या अळ्यांसोबत पांढरी माशी तसेच खोड कीड अर्थात गर्डल बीटलचा प्रादुर्भाव आढळतो, अशा ठिकाणी थायामेथोक्झाम + लॅम्ब्डा-सायहॅलोथ्रिन १२५ मिली प्रति हेक्टर किंवा बेटासायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड ३५० मिली प्रति हेक्टर या मिश्र कीटकनाशकांची फवारणी करता येईल.
याशिवाय क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल ०९.३० टक्के + लॅम्ब्डा-सायहॅलोथ्रिन ०४.६० टक्के झेडसी २०० मिली प्रति हेक्टर किंवा इंडॉक्साकार्ब १५.८० टक्के ईसी ३३३ मिली प्रति हेक्टर यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
फवारणीपूर्वी काळजी घेण्याचे आवाहन
शेतकऱ्यांनी केवळ कीड दिसली म्हणून तातडीने रासायनिक फवारणी न करता पिकाची नियमित पाहणी करून आर्थिक नुकसान पातळीच्या आधारेच कीड नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. कीटकनाशकांची फवारणी करताना शिफारस केलेले प्रमाण, उत्पादनाच्या लेबलवरील सूचना आणि आवश्यक सुरक्षितता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाने केले आहे.








