पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक; आ. डॉ. संजय कुटे यांचे मार्गदर्शन!
पुणे (आकाश बोरसे) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी राजकीय वाटचाल तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दिवसभर झालेल्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे आणि पक्षाची भूमिका तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बूथस्तरापासून पक्षाची संघटना अधिक मजबूत करून आगामी काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या अधिकारांच्या प्रश्नावर काँग्रेस व विरोधी पक्षांच्या भूमिकेवर टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेसाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
‘सबका साथ, सबका विकास’ या विचारधारेतून समाजातील सर्व घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. आगामी काळातील संघटनात्मक आणि राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने व प्रभावीपणे काम करण्याचे आवाहनही करण्यात आले.
या बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा भारती पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, गणेश नाईक, पंकजा मुंडे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, खासदार अशोक चव्हाण, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार निरंजन डावखरे, माधवी नाईक, सुनील राणे, राजेश पांडे यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)









