जीवनविद्या मिशनचा उपक्रम; बंदी व कर्मचाऱ्यांना बांधल्या राख्या!
बुलढाणा, (युवा क्रांती वृत्तसेवा) : नातेवाईकांपासून दूर असलेल्या बंद्यांना रक्षाबंधनाची उणीव भासू नये आणि त्यांच्या मनात आनंदाचे व आपुलकीचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने बुलढाणा जिल्हा कारागृहात रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून बंद्यांच्या मानसिक परिवर्तनासाठी विविध सामाजिक व प्रशासकीय उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून २८ ऑगस्ट रोजी कारागृहात रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. जीवनविद्या मिशनच्या सदस्यांनी कारागृहातील सर्व बंदी तसेच कर्मचाऱ्यांना राखी बांधून स्नेहबंध जपला.
या उपक्रमामुळे बंद्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होऊन कारागृहात सकारात्मक आणि आनंदी वातावरण तयार झाले. नातेवाईकांपासून दूर असलेल्या बंद्यांसाठी हा उपक्रम भावनिक आधार देणारा ठरला.
कार्यक्रमास कारागृह अधीक्षक मेधा बाहेकर, तुरुंगाधिकारी उमेश नाईक तसेच जीवनविद्या मिशनच्या भुपाली तायडे, मंगला अनासने, मिनाक्षी बंड, गजानन उमाळे आणि संदीप तायडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुभेदार दरेसिंग चव्हाण, हवालदार संजय मदरकर, कारागृह शिपाई राहुल पवार, आनंद पवार, दीपक वाघ यांच्यासह कारागृहातील इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.








