मेहकर, सिंदखेडराजा व बुलढाणा तालुक्यात कारवाई; जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू!
बुलढाणा, (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. ८ सप्टेंबर – अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध बायोडिझेलच्या साठवणूक व विक्रीविरोधात धडक कारवाई केली. मेहकर तालुक्यातील मोकळ्या जागेत तसेच सिंदखेडराजा येथील हॉटेल गावकरी फॅमिली रेस्टॉरंटसमोरील अवैध बायोडिझेल पंपावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल २१ लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य दक्षता पथक, मुंबई यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान मालमोटार ट्रकसह बायोडिझेलसदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये Ashok Leyland कंपनीचा ट्रक, भूमिगत लोखंडी टाकी, डिस्पेन्सर युनिट, डिझेल साठा, पाइप आणि इतर साहित्याचा समावेश आहे.
नियंत्रक शिधावाटप तथा राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळी अवैधरीत्या बायोडिझेलची साठवणूक व विक्री केली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
जप्त करण्यात आलेला बायोडिझेलसदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थ नेमका कोठून आणण्यात आला, याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि संबंधित आरोपींचा शोध घेण्यात येत असून, त्यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये (Essential Commodities Act) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
स्थानिक पोलीस आणि पुरवठा विभागाकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.
या कारवाईत राज्य दक्षता पथकातील उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रूपेश विजय बिजनावर, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरे यांच्यासह शिधावाटप निरीक्षक आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
जिल्ह्यातील अवैध इंधन तसेच गॅस तस्करीविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांनी दिला.









