आझाद समाज पार्टीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; पीक पाहणी व पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी
बुलढाणा (आकाश बोरसे) : दि. ८ सप्टेंबर : बुलढाणा जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी न लावल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुजित बांगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी पिके सुकून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, औषधे तसेच मशागतीवर मोठा खर्च केला. मात्र, पावसाअभावी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
सर्व तालुक्यांत पीक पाहणी व पंचनाम्यांची मागणी
संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, खामगाव, नांदुरा, मलकापूर, मोताळा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार आणि बुलढाणा या सर्व तालुक्यांमध्ये तातडीने पीक पाहणी व पंचनामे करून वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
नुकसानग्रस्त सर्व पिकांना हेक्टरी भरीव नुकसानभरपाई द्यावी, पीक कर्ज व कृषी कर्जाबाबत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच पीकविमा नुकसानभरपाई तातडीने मंजूर करून ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी
दुष्काळी परिस्थितीचा परिणाम पशुधनावरही होण्याची शक्यता असल्याने जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच प्रभावित गावांमध्ये शेतमजूर व कष्टकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते व आवश्यक कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आझाद समाज पार्टीच्या वतीने शेतकरी, कष्टकरी व शेतमजुरांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुजित बांगर यांनी प्रशासनाला दिला आहे.
निवेदन देतेवेळी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुजित बांगर, जिल्हा नेते पंकज शेगोकार, काशिनाथ हावरे, संदीप अजने, हिरकन्या अजने, सुनीता बिलेवार, देविदास अजने, देवमन अजने, भीमराव अजने, विठ्ठल ठाकरे, अजाबराव जमाव, मंगेश कोल्हे, दिलीप जमाव, संतोष अजने यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)








