बुलढाणा, (युवा क्रांती वृत्तसेवा)दि. 22 (जिमाका) : गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नांदुरा येथील श्रीमंत दगडूसेठ हलवाई गणेशोत्सव मंडळात कृषी विभागाच्या विविध योजना, सुविधा व उपक्रमांची माहिती देऊन नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात गणेश मंडळांच्या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येतात. या संधीचा उपयोग करून जिल्हा माहिती कार्यालयाने ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
नांदुरा येथील कार्यक्रमात कृषी अधिकारी श्री. परमार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सुविधांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया तसेच संबंधित विभागाशी संपर्क साधण्याची पद्धत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
‘गणरायाचे दर्शन आणि योजनांची माहिती’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या विविध योजना व सुविधांची माहिती गावपातळीवर थेट मिळत असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. सर्व पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन उपलब्ध सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास कृषी अधिकारी श्री. परमार, श्रीमंत दगडूसेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








