बुलढाणा | जिमाका (युवा क्रांती वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी ‘Central DCS MH’ ॲपद्वारे ई-पीक पाहणी व नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी १० नोव्हेंबर २०२६ पूर्वी गावातील नियुक्त पीक पाहणी सहाय्यकाकडून आपल्या पिकांची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जमाबंदी आयुक्त तथा संचालक, भूमी अभिलेख कार्यालयाच्या निर्देशानुसार ही मोहीम ११ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. ई-पीक पाहणी अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी प्रत्येक गावात विशेष पीक पाहणी सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जिल्ह्यातील एकूण ८ लाख ४१ हजार १९६ मालकी प्लॉटची पीक पाहणी करावयाची आहे. त्यापैकी ३ लाख ८९ हजार ६६५ प्लॉटवर संबंधित सहाय्यकांमार्फत ७/१२ वर पिकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित प्लॉटवरील शेतकऱ्यांनी नियुक्त सहाय्यकाकडून ई-पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
१०० टक्के ई-पीक पाहणी आवश्यक
‘Central DCS MH’ ॲपद्वारे संबंधित सहाय्यकाने थेट शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून माहिती अपलोड करणे आवश्यक आहे. खरीप हंगामात शेतात उभे असलेले पीक, कायम पड तसेच चालू पड जमिनीची नोंद करणे आवश्यक असून १०० टक्के ई-पीक पाहणी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.
पीक विमा व शासकीय योजनांसाठी नोंद महत्त्वाची
ई-पीक पाहणीद्वारे पिकांची नोंद न केल्यास ७/१२ उताऱ्यावरील ‘पीक पेरा’ रकाना कोरा राहू शकतो. त्यामुळे पीक विमा, शासकीय अनुदान तसेच विविध योजनांचा लाभ मिळविताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अवेळी पाऊस किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी ७/१२ वर अचूक पीक नोंद असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी ई-पीक पाहणी पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.








