शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरातील खामगाव-शेगांव रोडवरील आदर्श रिसॉर्ट येथे मध्यरात्री पोलिसांनी मोठी धाड टाकत जुगार (ताशपत्ता) खेळणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी पथकाने केली.
सदर धाडीत पोलिसांनी अनेक राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतले असून, या कारवाईदरम्यान सुमारे १ कोटी ५० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन, वाहनांसह ताशपत्ते आणि इतर साहित्याचा समावेश आहे.
विश्वसनीय सूत्रांनुसार, या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डीवायएसपी पथकाने पाळत ठेवून ही धाड टाकली.
पोलिसांच्या या कारवाईनंतर शहरात खळबळ उडाली असून, अनेक मोठे “मासे” या कारवाईत गळाला लागल्याची चर्चा शहरात जोरात सुरू आहे. या घटनेत काही राजकीय गटातील प्रभावशाली लोकांची नावेही समोर येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, अधिकृत माहिती मिळताच संबंधितांची नावे जाहीर केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.








