जळगांव जा. (युवा क्रांती वृत्तसेवा) : जळगांव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील तीन अल्पवयीन मुली घरातून कोणाला न सांगता बाहेर पडल्या होत्या. उशिरापर्यंत मुली घरी न परतल्याने पालकांनी तात्काळ जळगांव जामोद पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
मुलींचा शोध घेण्यासाठी बुलढाणा पोलिस दलातील पाच स्वतंत्र तपास पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. कसून शोधमोहीम राबवित अखेर पोलिसांना तीनही मुलींचा ठावठिकाणा मिळाला. मुलींना सुरक्षित ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, आज सायंकाळपर्यंत तिन्ही मुलींची त्यांच्या कुटुंबीयांकडे स्वाधीन करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फक्त २४ तासांत तीन अल्पवयीन मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना मिळालेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पाच पथकांच्या तात्काळ आणि प्रभावी कार्यवाहीमुळे ही शोधमोहीम यशस्वी ठरली.












