शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा): संत नगरी शेगाव येथे २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान भव्य ‘आयुष आरोग्य महामेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. आयुष मंत्रालय यांच्या वतीने विसावा परिसरात होणाऱ्या या मेळाव्याचे उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी ३ वाजता शेतकरी बांधवांसाठी आयुर्वेदिक शेती उत्पादन व विक्री मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पारंपरिक शेतीसोबत वनशेती आणि औषधी वनस्पती लागवडीकडे वळल्यास शाश्वत उत्पन्न मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयुर्वेदिक शेती उत्पादन व विक्री मार्गदर्शन
या महामेळाव्यात शेतकऱ्यांसाठी वन औषधी शेती, प्रक्रिया उद्योग आणि विपणन यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. आयुर्वेदिक शेतीमुळे उत्पादनाला अधिक बाजारपेठ उपलब्ध होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमात National Medicinal Plants Board, नवी दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. (डॉ.) महेश कुमार दाधीच तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत नागार्जुन वन औषधी प्रकल्पाचे प्रभारी डॉ. नितीन पतके शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देणार आहेत.
आयुष विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स
मेळाव्यात आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या सर्व आयुष शाखांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. नागरिकांना मोफत आरोग्य सल्ला, औषधी वनस्पतींची माहिती तसेच नैसर्गिक उपचार पद्धतींबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
दुहेरी उद्देश: शेतकरी सक्षमीकरण आणि जनतेचे आरोग्य
शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी औषधी वनस्पतींच्या उत्पादनाकडे वळावे, जेणेकरून त्यांना शाश्वत व अधिक उत्पन्न मिळेल आणि जनतेलाही दर्जेदार नैसर्गिक उपचार उपलब्ध होतील, असा मानस केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षा व नियोजनाची तयारी सुरू आहे. २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान शेगावात आरोग्य आणि शेतीविषयक ज्ञानाचा हा महाउत्सव अनुभवता येणार आहे.








