संग्रामपूर (आकाश बोडसे): संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात आगामी ६ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ४ मार्च रोजी दुपारी ४ वाजता महत्त्वपूर्ण शांतता समितीची बैठक पार पडली. ही बैठक सोनाळा पोलिस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती.
४ ऑक्टोबर २०२५ रोजी देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गावात पुन्हा सलोखा आणि सामाजिक समन्वय राखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. या बैठकीला दोन्ही समाजातील नागरिक, पदाधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी मलकापूर आनंद महाजन यांनी शिवजयंती उत्सव शांततेत, अनुशासनात आणि नियोजनबद्ध पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत सोनाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांनीही मार्गदर्शन करत मिरवणुकीदरम्यान नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. कोणतीही अफवा पसरवू नये आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश टाळावेत, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
बैठकीच्या शेवटी गावात शांतता, सामाजिक ऐक्य आणि परस्पर सलोखा कायम ठेवण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.(युवा क्रांती वृत्तसेवा)









