जळगांव जामोद (आकाश बोरसे): जळगांव जामोद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज भाजपकडून मोठ्या उत्साहात नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. नगराध्यक्ष पदासह 10 प्रभागांमधील एकूण 21 उमेदवारांनी शिस्तबद्ध, ताकदवान आणि सामूहिक एकजुटीची झलक दाखवत अर्ज दाखल केले. उपस्थितीमुळे पक्षातील एकसंधता आणि संघटनशक्तीचे प्रभावी प्रदर्शन पाहायला मिळाले.
नामांकनानंतर सर्व उमेदवारांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी भेट देत पारंपरिक औक्षण स्वीकारले. प्रत्येक उमेदवाराचे ऊबदार स्वागत करत आगामी निवडणुकीसाठी अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या.

भाजपने या निवडणुकीत “शांतता, सर्वसामान्य जनतेची कामे आणि नागरिकांचा सन्मान” हा आपला मुख्य मंत्र जाहीर केला आहे. पक्षनेत्यांनी सांगितले की, “निवडणूक ही केवळ मतदानाची प्रक्रिया नाही, तर शहराच्या भविष्याचा मार्ग आखण्याची संधी आहे.” जळगाव जामोद नगर परिषदेच्या माध्यमातून विकासाची गती कायम ठेवत शहराला पुढील पायरीवर नेण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.
शहराच्या सर्वांगीण आणि सातत्यपूर्ण विकासासाठी जनतेचा आशिर्वाद अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नमूद करत, जळगणक जामोद शहरातील सर्व आदरणीय मतदार बंधू-भगिनींनी भाजपच्या सर्व उमेदवारांना आशिर्वाद द्यावा, अशी नम्र विनंती पक्षातर्फे करण्यात आली आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)









