जळगांव जा.(युवा क्रांती वृत्तसेवा) : जळगांव जामोद नगरपरिषद निवडणुकीत आज सकाळपासूनच उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात झाली आहे. शहरातील मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडत लोकशाहीच्या या महत्त्वाच्या पर्वात सहभागी होत आहेत.
जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री संजय कुटे यांनीही सकाळी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी नागरिकांना कळकळीचे आवाहन करत सांगितले की, लोकशाही बळकट करण्यात प्रत्येक मतदाराचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुयोग्य लोकप्रतिनिधींची निवड ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची कर्तव्य आहे.
आमदार कुटे म्हणाले की, ही निवडणूक ही केवळ एका दिवसाची घटना नसून जळगांव जामोदच्या पुढील पाच वर्षांच्या विकासदिशा ठरवणारी प्रक्रिया आहे. पायाभूत सुविधा, शहर नियोजन, नागरिकांसाठीच्या मूलभूत सुविधा यासाठी सक्षम नेतृत्वाची निवड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांना विशेष विनंती करत ते म्हणाले कि ज्या मतदारांनी अद्याप मतदान केले नाही, त्यांनी कोणत्याही अफवांकडे दुर्लक्ष करून निर्भयपणे मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा. आपले एक मत शहराच्या प्रगतीला नवी दिशा देऊ शकते.
जळगांव जामोदच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजचा दिवस निर्णायक ठरणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाही अधिक मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









