काँग्रेस नेत्यावर संचालकाच्या पत्नीच्या अपहरणाचा आरोप; राजकीय वातावरण तापले!
खामगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) :
खामगांव कृषि उत्पन्न बाजार समितीतील सभापती सुभाष पेसोडे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावाला आता नाट्यमय वळण लागले आहे. अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर आज (१३ नोव्हेंबर) एका महिला संचालकाच्या पतीने काँग्रेस नेत्यावर आपल्या पत्नीच्या अपहरणाचा गंभीर आरोप करत एएसपी श्रेणिक लोढा यांच्या कार्यालयात धाव घेतली.
या प्रकरणामुळे राजकीय वातावरण आणखीनच तापले असून, महायुती व काँग्रेस दोन्ही गटांमध्ये चांगलाच गोंधळ उडाल्याचे चित्र दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधात १८ पैकी १३ संचालकांनी ३ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सभा घेण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून उपविभागीय दंडाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी समितीच्या परिसरात — माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख टीएमसी यार्ड येथे — १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.
अविश्वास प्रस्तावाच्या प्रक्रियेत अस्वस्थ झालेल्या काही नेत्यांनी फोडाफोडीचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याच दरम्यान आज झालेल्या नाट्यमय घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महिला संचालकाच्या पतीने काँग्रेस नेत्यावर “माझ्या पत्नीला घरात डांबून ठेवले आहे” असा आरोप करीत अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.
या घटनेची माहिती मिळताच महायुतीतील तसेच काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पोलिस ठाण्यात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, पोलिसांनी संबंधित तक्रारीची दखल घेत शेगावकडे रवाना झाल्याचे वृत्त मिळाले आहे. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची चौकशी सुरू होती.
या सर्व घडामोडींमुळे खामगाव कृउबास सभापतींच्या अविश्वास सभेला नाट्यमय वळण लागले असून, १४ नोव्हेंबर रोजीची सभा अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









