खामगांव(युवा क्रांती वृत्तसेवा) : खामगांव-जलंब रेल्वे लाईनवर सोमवारी (दि. २४ नोव्हेंबर) सायंकाळी साधारणपणे ५ वाजेच्या दरम्यान एक गंभीर घटना घडली. रेल्वे परिसरातील जुनी पाण्याची टाकी अचानक कोसळल्याने काही वेळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या दुर्घटनेमुळे रेल्वे विभागाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
घटनेनंतर रेल्वे प्रशासन व स्थानिक कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून मार्गावरील अडथळे दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. पाण्याची टाकी कोसळण्यामागे कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी जुन्या संरचनांची दुरुस्ती व सुरक्षिततेच्या दृष्टीने वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रेल्वे वाहतूक काही वेळ सामान्य झाली असून विभागाकडून पुढील उपाययोजना सुरू आहेत.












