---Advertisement---

कवठळ-भेंडवळ मार्गावर भीषण अपघात; पातुर्डा बु. येथील शिक्षिकेचा जागीच मृत्यू!!

---Advertisement---

संग्रामपूर(आकाश बोडसे): कवठळ-भेंडवळ रस्त्यावर पेसोडा फाट्याजवळ अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत पातुर्डा बु. येथील रहिवासी असलेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. २ मार्च) सकाळी सुमारे सव्वा सात वाजता घडली.

मृत शिक्षिकेचे नाव वृषाली प्रकाश गावंडे (वय ३६, रा. पातुर्डा बु.) असे आहे. त्या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होत्या.

शाळेकडे जात असताना अपघात

नेहमीप्रमाणे त्या एमएच २८ एएल ५८१५ क्रमांकाच्या स्कुटीने शाळेकडे जात असताना कवठळ-भेंडवळ मार्गावर पेसोडा फाट्याजवळ मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक पातुर्डा फाट्याकडे पळून गेल्याची माहिती शेताकडे जाणाऱ्या नागरिकांनी दिली.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिस ठाणे व तामगाव पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळ जळगाव जामोद पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघातातील फरार वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

परिसरात शोककळा

शवविच्छेदनानंतर पातुर्डा येथील स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली निधनामुळे पातुर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सासू-सासरे व आप्तपरिवार असा परिवार आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment