वरवट बकाल |(आकाश बोडसे):सातपुडा शिक्षण संस्था द्वारा संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय, वरवट बकाल यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दि. २० ते २७ फेब्रुवारी दरम्यान दत्तक ग्राम काटेलधाम येथे उत्साहात पार पडले.
या सात दिवसीय शिबिरात स्वयंसेवकांनी श्रमाचे महत्त्व, सामूहिक कार्यपद्धती, शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीचे प्रत्यक्ष धडे घेत ग्रामविकासासाठी ठोस कामे केली.
समाजसेवक घडवणारी कार्यशाळा – डॉ. स्वातीताई वाकेकर
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. स्वातीताई वाकेकर उपस्थित होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, “रासेयो शिबिर म्हणजे समाजसेवक घडवणारी कार्यशाळा आहे. स्वयंसेवकांच्या माध्यमातून ग्रामविकासात मोठा हातभार लागतो.”
प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ. श्रीराम घेरणकर, सरपंच सौ. संगीताताई वानखेडे, उपसरपंच अनिल कुरवाडे, विश्वस्त मिलिंद खेर्डीकर, मनोहर कुकडे, श्री संत गुलाबबाबा संस्थान चे प्रतिनिधी तसेच प्रतिष्ठित नागरिक शेषराव वानखडे, मोहन कुकडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलसंधारणासह विविध उपक्रम राबविले
प्रास्ताविकात रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नागेश इंगळे यांनी सात दिवसांत राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
प्राचार्य डॉ. श्रीराम घेरणकर यांनी स्वयंसेवकांच्या समर्पित वृत्तीचे कौतुक करताना सांगितले की, “जलसंधारणासाठी केलेले कार्य शेती आणि ग्रामविकासासाठी दीर्घकालीन उपयोगी ठरेल.”
शिबिरात राबविलेले प्रमुख उपक्रम:
- ग्रामस्वच्छता अभियान
- रस्ते दुरुस्ती
- वृक्षारोपण
- जलसंधारण उपक्रम
- प्लास्टिक मुक्ती अभियान
- आरोग्य जनजागृती
- व्यसनमुक्ती प्रचार
- सामाजिक विषयांवरील बौद्धिक सत्रे
ग्रामस्थ शेषराव वानखडे यांनी स्वयंसेवकांचे कौतुक करत गावकऱ्यांच्या वतीने आभार मानले. सरपंच व उपसरपंचांनी गावातील बांधाच्या पुनरुज्जीवनाचे कार्य पूर्ण करण्याचे आश्वासन दिले
शस्वी नेतृत्व व समारोप
शिबिराचे नेतृत्व मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. नागेश इंगळे, सह-कार्यक्रमाधिकारी प्रा. निलेश शेळके आणि महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. माधुरी हिंगणकर यांनी केले.
समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी कुचेकर यांनी तर आभार प्रदर्शन कु. राधिका कटोरे यांनी केले. काटेलधाम येथील ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.(युवा क्रांती वृत्तसेवा)








