खामगांव (युवा क्रांती वृतसेवा): गृह विभागाच्या ताज्या बदल्या परिपत्रकानुसार राज्यभरातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुका बदलल्या गेल्या असून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारीपदी (SDPO) प्रदीप मुरलीधर पाटील यांची बदली झाली आहे. या बदल्या परिपत्रकामुळे जिल्ह्यात पोलीस प्रशासनाला नवे बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
प्रदीप पाटील हे यापूर्वी मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी मेहकर उपविभागात कार्यरत असताना केलेल्या काटेकोर कारवाई, गुन्हेगारीविरोधी भूमिका आणि कडक शिस्त यामुळे नागरिकांमध्ये विश्वास आणि गुन्हेगारांच्या मनात धडकी निर्माण झाली होती. त्यांच्या कार्यशैलीमुळे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात यश आले होते.
खामगांव हे बुलढाणा जिल्ह्यातील व्यापारी, सांस्कृतिक तसेच दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. शहर व परिसरात वाहतूक व्यवस्थापन, व्यापारी हालचालींमुळे गुन्हेगारीचे प्रमाण आव्हानात्मक असते. अशा पार्श्वभूमीवर प्रदीप पाटील यांची खामगाव येथे झालेली नेमणूक विशेष महत्त्वाची ठरत आहे. त्यांच्या बदलीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही बदली पोलीस प्रशासनासाठी बळकटी देणारी ठरणार असल्याचे जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.
शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख सर्वत्र असून, जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता निर्भीडपणे काम करण्याची त्यांची ख्याती आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे, स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवून कायदा-सुव्यवस्था राखणे, तसेच नागरिकांशी संवाद साधून पोलीस दलाबद्दल विश्वास वाढविणे ही त्यांची खासियत आहे.
खामगांव उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर लवकरच गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रदीप पाटील कोणत्या धोरणांची अंमलबजावणी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








