शेगांव |(युवा क्रांती वृत्तसेवा): दि. 3 एप्रिल 2026 रोजी शेगांव शहरातील बस डेपो परिसरात एका बस चालकाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी स्वच्छक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 296, 115(2), 351(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी सचिन गणेशराव सनगाळे (वय 39, व्यवसाय – बस चालक, शेगांव आगार, रा. अकोला) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
ही घटना 3 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता शेगांव येथील अळसना रोडवरील बस डेपो परिसरातील वाहन परीक्षक कक्षात घडली. आरोपी प्रमोद गणपत पोहरे (रा. रोकडीयानगर, शेगांव) हा स्वच्छक कर्मचारी तेथे येऊन फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करू लागला. फिर्यादीने विरोध केल्यानंतर आरोपीने त्यांना लोटपाट करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच, आरोपीने फिर्यादीच्या ड्युटीवरील वाहनाचे ब्रेक फेल करण्याची धमकी देत “तू शेगांव येथे कशी ड्युटी करतो ते पाहतो” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पो.हे.का. निलेश गाडगे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.हे.का. संजय करुटले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. घटनेमुळे बस डेपो परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.







