शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा): दि. १ एप्रिल ला तालुक्यातील पाडसुळ फाटा परिसरात एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय २४, रा. पाडसुळ, ता. शेगांव) या आपल्या पतीसोबत उपचारासाठी दवाखान्यात जाऊन घरी परत येत होत्या. दरम्यान, पाडसुळ फाटा येथे त्या मोटारसायकलवरून खाली उतरल्या असताना आरोपी रतन सुरेश दाभाडे (रा. पाडसुळ) हा पाठीमागून मोटारसायकलवर आला.
आरोपीने फिर्यादीशी अश्लील बोलणे करत “तुझा पती काही कामाचा नाही, माझ्याकडे पैसे आहेत, आपण शेगांवला जाऊन मजा करू” असे म्हणत तिचा हात पकडला आणि अश्लील कृत्य करीत विनयभंग केला, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
घटनेच्या वेळी फिर्यादीचा पती व इतर साक्षीदार घटनास्थळी आले असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन शेगांव ग्रामीण येथे कलम 74, 75, 352, 351(2), 351(3)
अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास अधिकारी एएसआय धनराज माने यांनी आरोपीला तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीची बुलढाणा कारागृहात रवानगी केली आहे.







