शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव शहरातील आठवडी बाजार शेगांव परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर दगडाने हल्ला केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी शेगांव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम 115(2), 118, 351(2), 352 BNS प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादी गणेश श्रीकृष्ण मुंडोकार (वय 33, रा. जगदंबा नगर, शेगांव) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, 5 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता फिर्यादी हे आठवडी बाजारात आपल्या मित्राच्या भाजीपाला दुकानावर गेले होते. त्यावेळी आरोपी सचिन अनंता मिरकुटे (रा. मोदी नगर, शेगांव) तेथे आला आणि “तू माझ्याविरुद्ध दिलेला रिपोर्ट मागे घे” असे सांगत शिवीगाळ करू लागला.
वाद वाढल्यानंतर आरोपीने फिर्यादीला चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जवळ पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यावर मारला, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम होऊन रक्तस्राव झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
जखमी फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात येऊन तोंडी तक्रार दिल्यानंतर तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात दाखल अधिकारी म्हणून LHC चारुशीला गवई यांनी काम पाहिले असून, पुढील तपास पो.हेका. सुनील सुसर करत आहेत.






