संग्रामपूर (आकाश बोरसे): संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस ठाण्यात दाखल दि.12 मार्च 2026 गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या २४ तासांत अटक केली. पुणे शहरातील भोसरी परिसरात गर्दीच्या ठिकाणी लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी शोधून काढत त्याच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषिकेश श्यामगीर गिरी (वय २७, रा. सोनाळा ता. संग्रामपूर) याने पीडित महिलेचा सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. तसेच पीडितेचे खाजगी फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून तिला धमकावत फोनवर बोलण्यास भाग पाडल्याचेही तपासात समोर आले आहे.
या घटनेप्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप काळे यांनी तातडीने तपास पथक गठीत करून आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले. पोलीस उपनिरीक्षक महादेव खोने, पोलीस कर्मचारी राहुल पवार व संजय सास्ते यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढत पुण्यातील भोसरी येथे सापळा रचून त्याला अटक केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास तामगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पंडितराव सोनवणे करीत असून न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)








