मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘विकसित महाराष्ट्र 2047’ व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याच्या सादरीकरणासंदर्भात बैठक.
मुंबई (युवा क्रांती वृतसेवा) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘विकसित महाराष्ट्र 2047’ व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याच्या सादरीकरणासंदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्याला 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्र करण्याच्या उद्देशाने अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांचा समावेश असलेले हे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले जात आहे. यात 4 लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. हे व्हिजन डॉक्युमेंट जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ध्येय निश्चित असल्यानंतर ध्येय प्राप्ती करण्याचा मार्गही प्रशस्त होतो. विकसित महाराष्ट्राचे ध्येय गाठण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन संकल्पना आणि जागतिक सद्यस्थिती लक्षात घेऊन या व्हिजन डॉक्युमेंटमधील उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी. हे डॉक्युमेंट केवळ देशात नव्हे तर जागतिक स्तरावर महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट बनविण्याच्या दिशेने मार्गदर्शक ठरावे, अशी सूचना ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

जनतेने या डॉक्युमेंटच्या निर्मितीसाठी घेतलेल्या सक्रिय सहभागाची नोंद घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले. एका सखोल विचार प्रक्रियेतून तयार झालेले व्हिजन डॉक्युमेंट आव्हानांचा सामना करूनही विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दस्तऐवज ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.










