पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी दिल्या भरभरून शुभेच्छा !
दिल्ली (युवा क्रांती वृतसेवा) : भाजप-एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल असलेल्या राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळवत नवा इतिहास रचला आहे.
माजी उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी निवडणूक झाली. भाजपने आपल्या नेहमीच्या धक्कातंत्रातच राधाकृष्णन यांचे नाव जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दुसरीकडे महाविकास आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली होती.आज झालेल्या मतदानात राधाकृष्णन यांना प्रचंड पाठिंबा मिळाला. 752 वैध मतांपैकी तब्बल 452 मतं राधाकृष्णन यांच्या बाजूने पडली, तर बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली. या निवडणुकीत 15 मतं बाद झाली. म्हणजेच राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाल्याने इंडिया आघाडीचे काही खासदार फुटल्याचं स्पष्ट झालं आहे.
उपराष्ट्रपती निवड मंडळात लोकसभेचे 543 व राज्यसभेचे 239 असे एकूण 782 सदस्य असतात. त्यापैकी 752 मतांची गणना वैध ठरली. या सर्वांमध्ये राधाकृष्णन यांना मिळालेला बहुमत स्पष्टपणे भाजप-एनडीएच्या रणनीतीला यशस्वी ठरवणारा ठरला.
सी.पी. राधाकृष्णन यांची झारखंडनंतर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती. राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना त्यांची महाराष्ट्रात नेमणूक झाली होती. आता ते थेट दिल्लीच्या उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत.








