शेगांव (युवा क्रांती वृतसेवा): शेगांव येथील एफ.एम. काशेलानी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा व जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कुस्ती व व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. कुस्ती स्पर्धेमध्ये हर्ष पोंदे याने ५५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक तर यश मनतकर याने ४५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला.
एफ.एम. काशेलानी स्कूलचे हे दोन्ही विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. तर व्हॉलीबॉल संघाने देखील उत्कृष्ट सांघिक नियोजन आणि कौशल्य दाखवत तालुक्यातून प्रथम येत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. स्थानिक राष्ट्रमाता इंदिरा गांधी शाळेमध्ये झालेली व्हॉलीबॉलची मॅच अतिशय चुरशीची झाली होती. यावेळी एफ.एम. काशेलानी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली खेळातील सतर्कता दाखवत विरोधी संघाला हरवत जिल्हास्तरासाठी आपले तिकीट पक्के केले. मैदानावर उपस्थित सर्व खेळाडूप्रेमींनी या संघाच्या प्रदर्शनाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. शाळेचे अध्यक्ष मनोज काशेलानी सर, संचालक कुणाल काशेलानी सर, सहसंचालक शुभम देशमुख सर, सल्लागार संचालिका भूमिका काशेलानी मॅडम व मुख्याध्यापिका योगिता गावंडे मॅडम यांनी क्रीडा शिक्षक प्रेम सावळे सर आणि सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
आमच्या शाळेच्या व्हॉलिबॉल आणि कुस्ती संघाने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.ही केवळ वैयक्तिक नव्हे तर संपूर्ण शाळेच्या क्रीडा क्षेत्राची मोठी उपलब्धी आहे. या यशामागे आमच्या खेळाडूंची मेहनत, समर्पण आणि सततच्या सरावाचा मोलाचा वाटा आहे. खेळाडू आणि त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आता पुढील टप्पा — जिल्हास्तर, विभागीय स्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तर गाठण्याची वेळ आली आहे. असे विचार क्रीडा शिक्षक प्रेम सावळे सर यांनी व्यक्त केले.






