दिल्ली (युवा क्रांती वृत्तसेवा) : अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “वर्ल्ड फूड इंडिया” या भव्य मेळाव्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ सप्टेंबरच्या सायंकाळी नवी दिल्ली येथे झाले. या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय आयुषमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रतापराव जाधव यांना उपस्थित राहण्याचा मान मिळाला.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “जागतिक अन्न सुरक्षेत भारताचे योगदान महत्त्वपूर्ण असून येणाऱ्या काळात हे योगदान अधिक मजबूत होईल. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सहकारी संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारतातील लहान शेतकरी देखील उत्पादने थेट बाजारपेठेत आणत आहे, हेच आत्मनिर्भर भारताचे दर्शन आहे.”
उद्घाटन सोहळ्यात रशियाचे उपपंतप्रधान दिमीत्री पात्रुशेव, अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान, रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हा मेळावा आतापर्यंतचा अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सर्वात मोठा मेळावा ठरत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि कृषी उद्योगाला चालना देणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. २१ पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमात आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांची उपस्थिती ही बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.










