शेगाव | (डी ललित) : 1 ऑगस्ट 2026 – श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन अकोला येथे परत जाणाऱ्या एका प्रवाशाचा ₹12,999 किमतीचा Realme 40X मोबाईल शेगाव रेल्वे स्थानकावरील बाकावर विसरला गेला होता. मात्र, लोहमार्ग पोलिसांनी तत्परता दाखवत काही वेळातच मोबाईलचा शोध घेऊन तो सुरक्षितपणे संबंधित प्रवाशाच्या ताब्यात दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, पियुष देवेंद्र निचळ (वय 35), रा. वानखेडे नगर, डाबकी रोड, अकोला हे 1 ऑगस्ट रोजी श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन 12111 डाउन अमरावती एक्सप्रेसने अकोल्याकडे रवाना झाले होते. गाडीत चढल्यानंतर त्यांना आपला लाल रंगाचा Realme 40X मोबाईल प्लॅटफॉर्मवरील बाकावर राहिल्याचे लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच ASI नारायण देवकर, ASI सुनील कवळकर, HC संजय चव्हाण आणि PC किरण डोके यांनी तत्काळ प्लॅटफॉर्मवर धाव घेत कसून शोधमोहीम राबवली. काही वेळातच मोबाईल सुरक्षित अवस्थेत मिळून आला.
यानंतर मोबाईल लोहमार्ग पोलीस ठाणे, शेगाव येथे जमा करण्यात आला. मोबाईल धारक पियुष निचळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. आवश्यक ताबा पावतीनंतर मोबाईल त्यांच्या स्वाधीन करण्यात आला.
मोबाईल परत मिळाल्याने पियुष निचळ यांनी लोहमार्ग पोलिसांच्या प्रामाणिकपणा, तत्परता आणि सेवाभावी कार्याचे कौतुक करत आभार व्यक्त केले.
यावेळी प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात यांनी रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच कोणतीही वस्तू हरवल्यास किंवा संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधण्याचेही त्यांनी सांगितले. (युवा क्रांती वृत्तसेवा)









