---Advertisement---

समुद्रातील मासेमारी नौकांचा उद्घाटन सोहळा अमित शाह यांच्या हस्ते संपन्न !

---Advertisement---

मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) : खोल समुद्रातील मासेमारी नौकांचा उद्घाटन सोहळा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी त्यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात दोन मच्छीमार सहकारी संस्थांना मासेमारी नौकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

या प्रसंगी अमितभाई शाह म्हणाले की, आगामी काळात भारतातील मत्स्य संपदा मोठ्या प्रमाणात वाढणार असून सहकाराच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायाला नवी गती मिळेल. त्यामुळे छोट्या-मोठ्या मच्छीमारांना थेट फायदा होईल आणि त्यांचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शाह यांनी पुढे सांगितले की, पुढील टप्प्यात अशा आणखी १४ मासेमारी नौका वितरित करण्यात येतील. गुजरात, ओडिशा आणि महाराष्ट्र या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार, केंद्र सरकारच्या मत्स्य व सहकार विभागांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत २०० मासेमारी नौका मच्छीमार बांधवांना देण्यात येणार आहेत.

या आधुनिक नौकांद्वारे तब्बल २५ दिवस खोल समुद्रात राहून मासेमारी करता येणार आहे. एकाच वेळी २० टन मासे वाहून नेण्याची क्षमता या नौकांमध्ये असून, समुद्रातील समन्वयासाठी इतर मोठ्या जहाजांचाही समावेश असेल. नौकांमध्ये राहण्याची व खाण्याची उत्तम सोय उपलब्ध करण्यात आली असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री पंकज भोयर तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment