मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा) : राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने तब्बल ३२ हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. आतापर्यंत ८ हजार कोटी रुपये अर्थसहाय्य म्हणून वितरित करण्यात आले असून, सुमारे ४० लाख शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळाला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत आणखी ११ हजार कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. या मदतीची रक्कम पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. मदतीसाठी निधीची कुठलीही कमतरता नाही. आजच्या निर्णयानंतर राज्यातील किमान ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत जमा केली जाणार आहे.”
यापूर्वी ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच मदत मिळाली होती, त्यांना आता उर्वरित हेक्टरसाठीचे अर्थसहाय्य देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे अतिवृष्टीमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे गेलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शेतकऱ्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










