संग्रामपूर (आकाश बोरसे) : संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर (आदिवासी भाग) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी भयावह प्रकारे खेळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आधीच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात घटत असताना, अशा निष्काळजीपणामुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधिकच डळमळीत होत असल्याची चिंता पालक व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (Pradhan Mantri Poshan Shakti Nirman) योजनेतून विद्यार्थ्यांना स्वच्छ, सकस व दर्जेदार आहार देण्यासाठी शासनाने काटेकोर नियमावली लागू केली आहे. आहार बनवणे, वाढणे, स्वच्छता, पोषक घटक याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिलेली असतानाही बावनबीर येथील शाळा प्रशासनाने ही नियमावली धाब्यावर बसवली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सर्वात धक्कादायक म्हणजे शाळेतील निरागस विद्यार्थ्यांना चक्क रद्दी पेपरवर खिचडी वाढली जात आहे. मुलं जेवत असतानाही त्यांच्यासमोर पसरलेले फाटके, मळकट कागद पाहून पालक व ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. स्वच्छता, सुरक्षितता, आरोग्य याची कोणतीही काळजी न घेता हा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
शासनाच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना उकळलेले, स्वच्छ भांडे, स्टीलची ताटे, स्वच्छ वातावरण, तसेच गुणवत्तापूर्ण साहित्य यांचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र बावनबीर शाळेत याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांनी शिक्षण विभागाकडे तपास व कठोर कारवाईची मागणी केली असून, आदिवासी भागातील मुलांच्या हक्काचा पोषण आहार कुणाच्याही निष्काळजीपणामुळे धोक्यात येऊ नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)









