शेगाव नगरपरिषद निवडणूक 2025 : तीन दमदार उमेदवार, आणि एकच विजेतेपद!
शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : येत्या नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 (ब) हा चर्चेचा विषय ठरत असून येथे भाजप, काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यातील तिरंगी लढतीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. आकाश नावकार (भाजप), दिनेश लहाने (काँग्रेस) आणि देविदास लोखंडे (शिवसेना उबाठा) हे उमेदवार मतदारांच्या विश्वासाची बाजू स्वतःकडे वळवण्यासाठी जोरदार मोहीम उभारताना दिसत आहेत.
युवकांमध्ये मजबूत पकड आणि संघटनाचा दम दाखवत आकाश नावकार प्रचाराच्या आघाडीवर दिसत आहेत. दुसरीकडे, अनुभवसंपन्न आणि सौम्य स्वभावाचे दिनेश लहाने स्थानिक प्रश्नांवर थेट भाष्य करत मतदारांशी संवाद साधत आहेत. तर शिवसेना (उबाठा) चे देविदास लोखंडे प्रभागातील घराघरात पोहोचून कार्यकर्त्यांच्या जोशात स्वतःची ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रभागातील मतदार मात्र अजूनही संभ्रमात असून जनतेचा कौल कोणाला मिळणार? याविषयी अंदाज लावणे कठीण झाले आहे. गल्लीनुक्कडवरील चर्चांपासून सोशल मीडियापर्यंत, ठिकठिकाणी एकच प्रश्न उपस्थित होत आहे—”शेवटची बाजी कोण मारणार?”
प्रचाराला वेग येत असताना येणारे काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. तीनही पक्षांनी आपली ताकद झोकून दिल्याने प्रभाग 3 (ब) मध्ये रंगत शिगेला पोहोचली आहे आणि मतदारांची अंतिम पसंती कोणाकडे झुकते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.










