दिव्यांग–अव्यंग विवाहासाठी ₹1.50 लाख, दिव्यांग–दिव्यांग विवाहासाठी ₹2.50 लाख अनुदान
(युवा क्रांती वृत्तसेवा) : राज्यातील दिव्यांग व्यक्तींना सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून थेट आर्थिक अनुदान देण्यात येणार असून या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या योजनेनुसार दिव्यांग–अव्यंग विवाहासाठी ₹1,50,000 तर दिव्यांग–दिव्यांग विवाहासाठी ₹2,50,000 इतके अनुदान देण्यात येणार आहे. हा निर्णय दिव्यांगांच्या सन्मानपूर्ण जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश पांडुरंग फुंडकर यांच्या पुढाकारातून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून, समाजातील दुर्लक्षित घटक मुख्य प्रवाहात यावेत, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी हे अनुदान त्यांच्या नव्या जीवनाची सुरुवात अधिक सुलभ व सन्मानजनक करणार आहे. सामाजिक समावेशन आणि समानतेच्या दिशेने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरातून व्यक्त होत आहे.












