---Advertisement---

BIG BREAKING | सुनेत्रा पवार उद्या घेतील उपमुख्यमंत्री पदाची शपथ !!

Sunetra Pawar Deputy CM News
---Advertisement---

(युवा क्रांती वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्य सरकारकडून ३ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अजितदादांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून कार्यकर्ते आणि समर्थक अजूनही या दुःखातून सावरलेले नाहीत.

दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव राष्ट्रवादीच्या गोटातून पुढे येत असून, त्यांनी हे पद स्वीकारण्यास होकार दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

उद्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

उद्या शनिवारी सकाळी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्रीपदासह पक्षातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त झाली आहेत. अजितदादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला आहे.

वरिष्ठ नेत्यांची खलबते

मुंबईत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ या वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीनंतरच शनिवारी राष्ट्रवादीची अधिकृत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीआधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास होकार दिल्याचे सांगितले जात आहे.

दुपारी २ वाजता आमदारांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची उद्या दुपारी २ वाजता विधिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीत गटनेतेपदाची निवड होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. या बैठकीला विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतरची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाणार आहे. उद्याच राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा नेता निवडला जाईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

बारामतीत कार्यकर्त्यांची गर्दी

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत दोन दिवस शुकशुकाट पाहायला मिळाला होता. मात्र, अस्थी विसर्जनानंतर उद्या शनिवारी शपथविधी होणार असल्याच्या चर्चेमुळे बारामतीतील सहयोग निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमू लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment