मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा): दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आलेला असतानाच आता अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अजितदादांच्या अस्थी विसर्जनानंतर राजकीय घडामोडींना नवं वळण मिळालं असून, शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब सध्या गोविंदबागेत उपस्थित आहे. अशा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी सुनेत्रा पवार यांना एक मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.
सुनेत्रा पवार देणार राजीनामा
सुनेत्रा पवार या आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं निश्चित झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार आपला राजीनामा राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.
या निर्णयामुळे महायुतीच्या गोटात मोठ्या हालचालींना वेग आला असून, राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आजच विधीमंडळ गटनेतेपदाची निवड
राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज दुपारीच सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेता म्हणून अधिकृत निवड केली जाणार असल्याची माहिती आहे. विधीमंडळात पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार असून, यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा मार्ग पूर्णपणे मोकळा होणार आहे. पक्षांतर्गत प्रक्रियेला सध्या वेग आला आहे.
आज संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, आजच संध्याकाळी 5:30 वाजता सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला जाणार असून, राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.










