छत्रपती संभाजीनगर (युवा क्रांती वृत्तसेवा) : मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आधीच्या सरकारने बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र, आमच्या सरकारने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा सुरू केला असून मराठवाड्यातील ‘दुष्काळ’ हा शब्द कायमचा पुसून टाकण्याचा आमचा ठाम निर्धार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
या प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार संजना जाधव, आमदार प्रा. रमेश भोरनारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कन्नड तालुक्याला आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे विकास निधी मिळाला नसल्याचे मान्य करत, येत्या काळात कन्नडचा विकास बॅकलॉग पूर्णपणे भरून काढण्याचे आश्वासन दिले.
“पाणी, रस्ते, वीज, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधा प्राधान्याने देण्यात येतील. मराठवाड्याचा विकास हाच आमच्या सरकारचा अजेंडा आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.










