अकोला | (डी ललित) : अकोला शहरातील डाबकी परिसरात विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तिच्या आईच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलीस ठाण्यात पतीसह सहाजणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव येथील व्यंकटेश नगर परिसरातील रहिवासी रेखा सुनिल रनित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची मुलगी पल्लवी प्रदीप मोरे (वय 29) हिचा विवाह 2 मार्च 2025 रोजी डाबकी येथील प्रदीप मोरे यांच्यासोबत झाला होता.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, विवाहानंतर पल्लवीला पती, सासू, सासरे, जेठ, जेठाणी व नणंद यांच्याकडून मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत होता. तसेच लग्नात दिलेले सोन्याचे दागिने गहाण ठेवल्याचा आणि ते परत मागितल्यावर मारहाण व धमक्या दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, 10 जुलै 2026 रोजी पल्लवीच्या पतीने फोन करून पती-पत्नीमध्ये वाद झाल्याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने पल्लवीला शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले. मात्र, कुटुंबीय अकोल्यात पोहोचल्यावर पल्लवीचा मृत्यू झाल्याचे समजले.
या प्रकरणात पल्लवीला सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत फिर्यादीच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी पती प्रदीप दयाराम मोरे, सासू गीताबाई दयाराम मोरे, सासरे दयाराम मोरे, जेठ संदीप दयाराम मोरे, जेठाणी सपना संदीप मोरे आणि नणंद चैताली संदेश पहुरकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 80(2), 108, 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डाबकी रोड पोलीस करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








