जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : आसलगाव ग्रामपंचायतीअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांच्या बिलाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समिती जळगाव जामोद येथील पदविस्तार अधिकारी संदीप उत्तम मोरे (वय ५२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) अमरावतीच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदार हा बांधकाम कंत्राटदार असून, त्याने २०२५-२६ या कालावधीत आसलगाव ग्रामपंचायतीअंतर्गत दोन नाली बांधकामे व एक पेव्हर ब्लॉक रस्ता अशी तीन विकासकामे पूर्ण केली होती. या कामांच्या बिलाचे देयक मंजूर करून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने बिलाच्या रकमेच्या तीन टक्के प्रमाणे २५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ACB अमरावतीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी १५ जुलै रोजी पंचासमक्ष करण्यात आली. त्यामध्ये लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ACBने सापळा रचला. कारवाईदरम्यान संदीप मोरे याने तक्रारदाराला लाचेची रक्कम आपल्या खासगी वाहनात ठेवण्यास सांगितले आणि ती स्वीकारताच ACBच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक राजेश राठोड, पोलिस निरीक्षक रवींद्र सहारे, पोलिस निरीक्षक स्वप्नील निराळे व त्यांच्या पथकाने केली. (युवा क्रांती वृत्तसेवा)








