बुलढाणा | (युवा क्रांती वृत्तसेवा) : १७ जुलै-राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी शुक्रवारी जिगाव धरण प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रकल्पातील उर्वरित सर्व कामे गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी आमदार चैनसुख संचेती, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, जिगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता परमजित सिंग जुनेजा, प्रवीण चावरे, गणेश हासे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता परमजित सिंग जुनेजा यांनी धरणाची सद्यस्थिती, जलसाठा क्षमता, सुरू असलेली कामे, भूसंपादन, पुनर्वसन आणि कालव्यांच्या उभारणीची प्रगती याबाबत माहिती दिली. प्रकल्पाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रभावी नियोजनावर चर्चा करण्यात आली.

धरण परिसराची पाहणी करताना मंत्री सावकारे यांनी भूसंपादन व पुनर्वसनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यावर भर दिला. पुनर्वसनासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करावा तसेच सिंचन क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बोलताना सावकारे म्हणाले की, जिगाव धरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतीला मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे कृषी उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होईल. प्रशासनाने समन्वयाने काम करून प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.










