---Advertisement---

Buldhana DCC Bank Election: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव बिनविरोध संचालक; जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट!!

---Advertisement---

बुलढाणा | (आकाश बोरसे) : 29 जुलै – बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीत महत्त्वाची घडामोड घडली असून, केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे जिल्हा बँकेतील आगामी सत्तासमीकरणाचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे.

प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था मतदारसंघातून प्रतापराव जाधव, त्यांचे बंधू माधवराव जाधव आणि दत्तात्रय शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, माधवराव जाधव आणि दत्तात्रय शेळके यांनी अर्ज मागे घेतल्याने प्रतापराव जाधव यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

प्रतापराव जाधव यांनी यापूर्वी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. तसेच ते मेहकर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या ते केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

यापूर्वी डॉ. राजेंद्र शिंगणे हेही संचालकपदी बिनविरोध निवडून आले होते. त्यांच्या विरोधातील उमेदवार दत्तात्रय देशमुख यांनी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर आज दत्तात्रय शेळके यांनीही माघार घेतल्याने प्रतापराव जाधव यांचा मार्ग मोकळा झाला.

विशेष म्हणजे, डॉ. राजेंद्र शिंगणे आणि प्रतापराव जाधव या दोघांच्या बिनविरोध निवडीत अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांचे नाव ‘दत्तात्रय’ असल्याने राजकीय वर्तुळात “दोघांनाही दत्त पावला” अशी चर्चाही रंगू लागली आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment