काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन; राहुल गांधींवरील एफआयआर रद्द करण्याचीही मागणी!
बुलढाणा | (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, पीक नुकसानभरपाईची रक्कम वितरित करावी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक सवलती द्याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबर रोजी हे निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने शेतीपिकांवर मोठा परिणाम झाला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शासनाने बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, पीक नुकसानभरपाईची प्रलंबित रक्कम वितरित करावी आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक सवलती द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

दरम्यान, उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. लोकशाही मूल्ये, संविधानिक व्यवस्था आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याची भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली.
निवेदन देताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील अवचार, आमदार धिरज लिंगाडे, माजी आमदार राजेश एकडे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. अरविंद कोलते, रामविजय बुरुंगले, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मंगलाताई पाटील, आशाताई गोंड, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मोहतेशाम रजा, इरफान पठाण, भगवान धांडे, संतोष आंबेकर, डॉ. पुरुषोत्तम देवकर, सतीश मेहनदरे, दत्ता काकस, दीपक रीढे, तुळशीराम नाईक, राम जाधव, कैलास फाटे, मिलिंद जयस्वाल, अतुल सिरसाठ, केशव हिंगणे, जाकीर कुरेशी, राजेंद्र वानखेडे, पुरुषोत्तम झाल्टे, सतीश टाकळकर, शेख अफरोज, गजन्फर खान, विजय पाटील, ईश्वर इंगळे, अनिल भारंबे, विश्वदीप पडोळ, शिवराज पाटील, अनिल संबारे, बबलू कुरेशी, अजहर देशमुख, सुनील कळसकर, मयुर राऊत, सुनील काकडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)









