बुलढाणा, दि. ९ : केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी. योजनांच्या कामातील अडचणी तातडीने दूर करून प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत. कोणताही पात्र नागरिक योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीचे अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी दिले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात दिशा समितीची बैठक पार पडली. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे यांच्यासह उपविभागीय अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पावसाचे प्रमाण कमी असल्याने संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन आराखडे तातडीने तयार करावेत. ‘अमृत’ योजनेअंतर्गत पाणीपुरवठा तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत. कामात दिरंगाई अथवा कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश जाधव यांनी दिले. ‘जल जीवन मिशन’अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासोबतच सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता कायम राखावी, असेही त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अधिकाधिक लोकहिताची कामे हाती घेऊन रोजगाराच्या संधी वाढवाव्यात. कुशल व अकुशल कामगारांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देतानाच मजुरीचे भुगतान वेळेत करावे. मनरेगाअंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांमध्ये गैरव्यवहार किंवा लाभार्थ्यांची आर्थिक अडवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मातोश्री पांदण रस्त्यांची कामेही प्राधान्याने पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
प्रधानमंत्री आवास योजनेतील कोणताही पात्र लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. घरकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर मंजूर निधी तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावा आणि देयके प्रलंबित ठेवू नयेत, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
पीक नुकसानीची तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी. शेतकऱ्यांकडून ई-पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी. ई-केवायसीबाबत तक्रारी असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत संबंधित यंत्रणांनी प्रत्यक्ष पोहोचून प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. कोणत्याही शेतकऱ्याला अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
पावसात झालेल्या खंडामुळे पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांना आवश्यक वीज उपलब्ध करून द्यावी. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पांना गती देतानाच ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेत शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचा अथवा विशिष्ट प्रकारचा मोटार पंप खरेदी करण्याची सक्ती करू नये, असे जाधव यांनी स्पष्ट केले.
पीएम गतीशक्तीअंतर्गत जालना-खामगाव नवीन रेल्वे मार्गाशी संबंधित भूसंपादनासह इतर प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून विकासकामांना गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत सिंचन प्रकल्प, पुनर्वसन, प्रधानमंत्री पीक विमा योजना, पीक विमा नुकसानभरपाई, पीक कापणी प्रयोग, फळबाग पीक विमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीएम-सूर्यघर मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, सौर कृषी पंप योजना, मनरेगा, १५ वा केंद्रीय वित्त आयोग, प्रधानमंत्री आवास योजना, अटल भूजल योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पीएम पोषण शक्ती निर्माण योजना, पीएम श्री शाळा, अंगणवाडी बांधकाम, भारतनेट, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे स्थानक व उड्डाणपूल आदी विविध योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
केंद्र शासनाच्या योजनांची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.









