जळगाव जामोद(आकाश बोडसे):सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जामोद या खेडेवजा शहरातून संघर्ष करत जिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारणारे डॉ. श्रीकृष्ण श्रीराम सुशीर यांचे यश आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन बुलढाणा अर्बन चे संचालक डॉ. किशोर केला यांनी केले.
सध्या खंडवा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. सुशीर यांनी 27 फेब्रुवारी रोजी बुलढाणा अर्बनच्या जळगाव जामोद शाखेला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात डॉ. किशोर केला म्हणाले, “जळगाव जामोदसारख्या छोट्या शहरातून संघर्ष करून प्रशासनाच्या उच्च पदापर्यंत पोहोचणे हे खरोखरच अभिमानास्पद आहे. डॉ. सुशीर यांचे यश आजच्या तरुणांसाठी दिशादर्शक ठरेल.”
यावेळी डॉ. सुशीर यांनी बुलढाणा अर्बनच्या शिस्तबद्ध कामकाजाचे व नियोजनबद्ध कार्यपद्धतीचे कौतुक केले. शाखा व्यवस्थापक योगेश जोशी, गजानन मालोकार, प्रसन्न गिरजापुरे, राधेश्याम चांडक, गजानन आंबुसकर यांच्यासह डॉ. सुशीर यांचे वडील श्रीराम सुशीर आणि शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी व उत्साहपूर्ण होते.(युवा क्रांती वृत्तसेवा)










