शेगाव | (डी. ललित) : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त आज दि. 29 जुलै रोजी मलकापूरहून श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी तब्बल 1,300 भाविकांची भव्य पायी दिंडी भक्तिमय वातावरणात शेगाव नगरीत दाखल झाली. गेल्या 19 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या दिंडीने श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाची परंपरा आजही जपली आहे.
शेगाव शहरात आगमन झाल्यानंतर श्री वर्धमान भवन येथे सौ. कोमल सचिन तायडे व श्री. सचिन तायडे यांच्या हस्ते दिंडीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी भाविकांवर पुष्पवृष्टी करून उत्साहात स्वागत करण्यात आले.
त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात, “गण गण गणात बोते” च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात दिंडी श्री संत गजानन महाराज मंदिराकडे मार्गस्थ झाली. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावात देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामध्ये मलकापूरहून आलेल्या 1,300 भाविकांच्या पायी दिंडीने विशेष लक्ष वेधून घेतले. शिस्त, सामूहिक भक्ती आणि सेवाभावाचे दर्शन घडविणाऱ्या या दिंडीमुळे शेगाव नगरीत आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. (युवा क्रांती वृत्तसेवा)
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇🏻









