पळशी झाशी,(आकाश बोरसे) : दि. 5 ऑगस्ट – पळशी झाशी येथे गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेच्या यशस्वी एक वर्षपूर्तीनिमित्त चालक विजय चव्हाण व वाहक एम. आर. भटकर यांचा ग्रामपंचायत पळशी झाशी व ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पळशी झाशी येथे अनेक वर्षे बस सेवा बंद होती. ही सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे व ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर गेल्या वर्षी गावात पुन्हा राज्य परिवहनची बस सेवा सुरू झाली.
सध्या पळशी झाशीहून सकाळी 8 वाजता शेगावकडे जाणारी बस दररोज प्रवाशांनी भरगच्च भरून जात असून, गावकरी, विद्यार्थी आणि प्रवाशांना त्याचा मोठा लाभ होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सकाळी 10 वाजताही नियमित बस सेवा उपलब्ध आहे.
गेल्या एका वर्षात या बस सेवेचा विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा झाला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पळशी झाशी येथून मुक्कामी बस सुरू करून सकाळी जळगाव जामोदसाठी थेट बस सेवा उपलब्ध करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली.
बस सेवा सुरू करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, जळगाव जामोद आगारातील सागर भाऊ कोठे तसेच सर्व चालक-वाहकांचे ग्रामपंचायत पळशी झाशी व ग्रामस्थांनी आभार मानले. (युवा क्रांती वृत्तसेवा )








