पळशी झाशी, दि. 21 जून (आकाश बोरसे): जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पळशी झाशी येथे आज रविवारी दि. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत नव्याने रुजू झालेले शिक्षक तथा पंचायत समितीचे गटसमन्वयक आणि संग्रामपूर केंद्राचे विद्यमान केंद्रप्रमुख श्री. मिलिंद दादा सोनोने यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता ताई गिरी, उपाध्यक्षा मुक्ताताई चितोडे, शिक्षणतज्ज्ञ अभय भाऊ मारोडे, सदस्य श्री. दामले व सर्व सदस्य, जिल्हा परिषद सदस्य भगतसिंग भाऊ पवार, पळशी झाशीच्या आदर्श महिला सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे, उपसरपंच पंचफुलाबाई पवार, माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीराम भाऊ बांगर, कडू भाऊ बांगर, शेषराव पेंटर, किरण ताई शिरसोले, शोभाताई वानखडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका डाबेराव मॅडम यांनी केले. यानंतर वावगे सर व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने करून दाखवली तसेच योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. उपस्थितांचे आभार देशमुख मॅडम यांनी मानले.
यावेळी सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “नव्याने रुजू झालेले मिलिंद दादा सोनोने यांच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी निश्चितच मोठा फायदा होईल. यापूर्वी संग्रामपूर तालुक्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यामुळे पळशी झाशी येथील शाळाही भविष्यात जिल्ह्यात अव्वल ठरण्यास वेळ लागणार नाही.” (युवा क्रांती वृत्तसेवा)










