संग्रामपूर I (आकाश बोरसे) : दि. 15 जून 2026 – पातुर्डा येथे शासनाच्या मालकीची रेती चोरी करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह पळून गेल्याप्रकरणी तामगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तामगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल माहितीनुसार, फिर्यादी संतोष सिताराम खरोते (वय 40), व्यवसाय ग्राम महसूल अधिकारी, टुनकी तहसील कार्यालय, संग्रामपूर यांच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 188/2026 अंतर्गत कलम 303(2), 221 भारतीय न्याय संहिता 2023 तसेच खाण आणि खनिज अधिनियम 1957 च्या कलम 21(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी रितेश ठाकरे (वय 35, रा. तेल्हारा, जि. अकोला) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
ही घटना एमएसईबी ऑफिससमोर, पातुर्डा ता. संग्रामपूर येथे दि. 13 जून 2026 रोजी रात्री 10 वाजेपासून ते 14 जून रोजी पहाटे 3 वाजेदरम्यान घडली. आरोपीने त्याच्या ताब्यातील लाल रंगाचे महिंद्रा 575 डीआय ट्रॅक्टर (क्रमांक MH-30 AB-7444) ट्रॉलीसह शासनाची अंदाजे 4 हजार रुपयांची एक ब्रास रेती चोरून नेल्याचा आरोप आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून तामगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास पोहेकॉ प्रमोद मुळे यांच्याकडे सोपविला आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)









