---Advertisement---

Shegaon : पोलीस मित्र गणराया पुरस्कार २०२६ स्पर्धेत सहभागी व्हा; ठाणेदार निमीष मेहेत्रे यांचे आवाहन!!

---Advertisement---

शेगाव, (डी ललित) दि. १७ सप्टेंबर : बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या पोलीस मित्र गणराया पुरस्कार २०२६ स्पर्धेत शेगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निमीष मेहेत्रे यांनी केले आहे.

या स्पर्धेत आदर्श गणराया उत्सव ५० गुण आणि मिरवणूक ५० गुण, अशा एकूण १०० गुणांच्या निकषांवर मंडळांचे परीक्षण करण्यात येणार आहे. आदर्श गणराया उत्सवाच्या निकषांमध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, सायबर अवेअरनेस, आरोग्य शिबिर व इतर सामाजिक उपक्रमांसाठी १० गुण देण्यात येणार आहेत. तसेच सामाजिक सलोखा व शांततापूर्ण उत्सवासाठी १० गुण, मूर्तीची सुबक सजावट, आकर्षक देखावे, परिसर स्वच्छता व शाडू मातीच्या मूर्तीला १० गुण देण्यात येणार आहेत.

प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळणे, तसेच मंडळाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करणे यासाठी १० गुण, तर संस्कृती स्पर्धेसाठी १० गुण निश्चित करण्यात आले आहेत.

मिरवणुकीच्या निकषांमध्ये लेझीम व डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यासाठी १० गुण, स्वयंसेवक नेमून वाहतूक व्यवस्था व मिरवणुकीदरम्यान पोलिसांना सहकार्य करून शिस्तबद्ध वर्तनासाठी १० गुण देण्यात येणार आहेत. दारूमुक्त व व्यसनमुक्त मिरवणूक, पोलीस स्टेशनच्या परवान्यातील नियमांचे काटेकोर पालन आणि पर्यावरणपूरक कृत्रिम विसर्जन व्यवस्थेला प्राधान्य या बाबींनाही गुण देण्यात येणार आहेत.

‘शिस्तबद्ध उत्सव, सुरक्षित समाज’ या संकल्पनेतून पर्यावरणाची जपणूक, सामाजिक एकता, कायद्याचे पालन आणि पोलिसांना सहकार्य या बाबींना प्रोत्साहन देत आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा पोलीस प्रशासनाचा उद्देश आहे. यासाठी मंडळांचे निरीक्षण करून गुण देण्यासाठी पंच समिती गठित करण्यात आली आहे.

पुरस्कार समिती गठित

पोलीस मित्र गणराया पुरस्कार २०२६ स्पर्धेसाठी शेगाव शहरातील गणेशोत्सव मंडळांचे निरीक्षण करून गुण देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग बुच, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजुषा भुतडा, डॉ. रवींद्र कराळे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शेगोकार तसेच पत्रकार प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ पत्रकार नंदूभाऊ कुळकर्णी आणि अ‍ॅड. प्रथमेश माने यांचा समावेश आहे.

शेगाव शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आदर्श व शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन ठाणेदार निमीष मेहेत्रे यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने केले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment