बुलढाणा जिल्ह्यातील ९ डाकघरांत २३ ऑगस्टला Rakhi Booking सुविधा; Speed Post वर १० टक्के सवलत!
बुलढाणा,(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. २२ ऑगस्ट – रक्षाबंधनाचा सण जवळ आल्याने भावाला वेळेत राखी पाठविण्यासाठी बहिणींची लगबग सुरू झाली आहे. नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन बुलडाणा डाक विभागाने विशेष व्यवस्था केली असून, रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील नऊ प्रमुख डाकघरांमध्ये राखी बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बुलडाणा प्रधान डाकघर, खामगाव प्रधान डाकघर, चिखली उपडाकघर, शेगाव उपडाकघर, मलकापूर उपडाकघर, नांदुरा उपडाकघर, देऊळगाव राजा उपडाकघर, मेहकर उपडाकघर आणि जळगाव उपडाकघर येथे रविवारी राखी बुकिंग करता येणार आहे.
Speed Post वर १० टक्के सवलत
राखी जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचावी यासाठी डाक विभागाने Speed Post ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रक्षाबंधनानिमित्त राखी पाठविण्यासाठी Speed Post दरावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे.
परदेशातही पाठविता येणार राखी
परदेशात राहणाऱ्या भावंडांनाही राखी पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय टपाल सेवेद्वारे माफक दरात परदेशात राखी पाठविता येणार आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये विशेष राखी लिफाफेही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा धागा वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी नागरिकांनी Speed Post, आंतरराष्ट्रीय टपाल सेवा तसेच १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक गजेंद्र जाधव यांनी केले आहे.








