शेगाव (डी ललित) : माझ्या शेजारी दुकान का लावले, या कारणावरून झालेल्या वादात २० वर्षीय तरुणाला चापट-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ तसेच धमकी दिल्याची घटना शेगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी एका ६५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सूर्यकांत अंकुशे (वय २०, व्यवसाय मजुरी, रा. बाहुपेठ, ता. जि. चंद्रपूर, ह.मु. गोमाजी पार्किंग, शेगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू पांडुरंग पटके (वय ६५, रा. शेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आरोपीने ‘माझ्या शेजारी दुकान का लावले?’ या कारणावरून फिर्यादीसोबत वाद घातला. त्यानंतर चापट-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली तसेच ‘तुला पाहून घेईल’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी आरोपीने जवळील चप्पल दुरुस्तीचे लोखंडी रापीने फिर्यादीच्या छातीच्या उजव्या बाजूस मारून जखमी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
घटनेनंतर मिळालेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे शेगाव शहर पोलिस ठाण्यात अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ व ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या आदेशाने बिट GPSI गजानन गावंडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








