शेगाव | (डी ललित) : शेगाव शहर पोलिसांनी बालकामगारांविरोधात कारवाई करत खामगाव-शेगाव रोडवरील महाराष्ट्र स्प्रिंग पार्ट्स अँड वेल्डिंग वर्क या आस्थापनावर धाड टाकून मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारवाईदरम्यान दोन 16 वर्षीय अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत असल्याचे पंचांसमक्ष आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 कलम 146 तसेच बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम, 2015 मधील कलम 75 व 79 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी श्रीमती दिपाली आशीष अडावतकर (वय 50) या दुकाने निरीक्षक (श्रेणी-2) तथा सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा आहेत.
या प्रकरणातील आरोपी शेख वसीम शेख करीम (वय 40, रा. इदगाह प्लॉट, शेगाव, जि. बुलढाणा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
28 जुलै 2026 रोजी दुपारी 3.15 वाजता भारत पेट्रोल पंपासमोरील महाराष्ट्र स्प्रिंग पार्ट्स अँड वेल्डिंग वर्क येथे छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान शेख आकीब शेख करीम (वय 16, रा. पेठ मोहल्ला, शेगाव) आणि शेख अमीर शेख हुसेन (वय 16, रा. जमजम नगर, शेगाव) हे दोघे अल्पवयीन मुलगे काम करताना आढळून आले.
फिर्यादीनुसार, संबंधित बालकामगारांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा गुन्हा पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक सरोदे यांनी नोंदविला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश गाडगे करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








